मुंबई - कोरोना पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही आपले पोलीस अत्यंत उत्तम रितीने कार्य करत आहेत. कोरोना संसर्गाचा मुकाबला करताना पोलीसांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, शासन त्यांच्या सदैव पाठीशी आहे असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगीतले. मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीसांसाठी सुरक्षा साधन संचाचे (किट) व स्पेशल प्लास्टीक मास्क वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमविरसिंह, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनय चोबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवल बजाज, उपायुक्त मुख्यालय श्रीमती एन. अंबिका, उपायुक्त (संचलन) प्रणय अशोक, उपायुक्त (झोन १) संग्रामसिंह निशानदार, उपायुक्त (झान २) राजीव जैन, उपायुक्त (एस. बी. १) गणेश शिंदे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राज्यातील पोलीस यंत्रणा या काळात आरोग्याचा धोका पत्कारुन १६-१६ तास कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीसांच्या सुरक्षेबाबत आधुनिक अशा या आरोग्याबाबतच्या सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे. हि बाब महत्वपुर्ण व अभिनंदनीय आहे. आपण वापरत असलेल्या नेहमीच्या मास्क व्यतिरिक्त या संचातील साधनांचा उपयोग केल्यास त्याचा फायदा पोलीसांना आरोग्य सुरक्षा दृष्टिने नक्कीच होईल असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगीतले. कोरोनामुळे जर एखादा पोलीस कर्मचारी मृत झाल्यास त्याच्या कुटूंबीयांसाठी शासनाने ५० लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. शासन पुर्णपणे पोलीसांच्या पाठीशी उभे आहे, याबद्दल पोलीस आयुक्त परमविरसिंह यांनी शासनाचे व गृहमंत्र्यांचे आभार मानले. गेल्या दहा तासांमध्ये राज्यात नवीन १४५ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३५ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच दिल्लीतल्या निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांच्या राज्यातील १२२५ जणांच्या यादीपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला आहे. यांपैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलं आहे. यांपैकी ७ जण कोरोनाबाधित असून पुणे, पिंपरीचिंचवड, अहमदनगर येथील प्रत्येकी २, तर हिंगोलीतील एका रुग्णाचा यामध्ये समावेश असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या आजारामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. लोकांना घरातून बाहेर पडता येत नाही तसेच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुबई पोलीस आयुक्तालयाकडून १० हजार सुरक्षा किटचे वाटप